निरा दि. ४ जून
विजय लकड़े
पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पुणे–पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा नदीच्या नविन पुलाच्या साईडपट्ट्यांमध्ये चिखल, घाण, झाडंझुडपं आणि तुटलेले जॉइंट रबर यामुळे भीषण अस्वच्छता आणि अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पालखी सोहळ्याच्या काही दिवसांआधीच या पुलाची झालेली दुर्दशा वारकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण करत आहे.
या मार्गावरून दरवर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते. हजारो वारकरी याच मार्गावरून नीरा नदी पार करत सातारा जिल्ह्यात प्रवेश करतात. त्यामुळे या पुलाचे धार्मिक व सांस्कृतिक दृष्टीने विशेष महत्त्व आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) याकडे दुर्लक्ष करत असल्याने वारकऱ्यांना चिखल आणि घाणीच्या साईडपट्ट्यांमधून वाट काढावी लागणार का, असा सवाल नीरा आणि पाडेगाव परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत.
जॉइंटमधील रबर तुटल्यामुळे वाहनांचेही नुकसान
सध्या पुलाच्या जॉइंटमधील रबर तुटल्यामुळे वाहनांना मोठ्या आवाजाने धक्के बसत असून, वाहनांचे नुकसान होत आहे. वाहनचालक व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.
जुना पूल ऐतिहासिक; नविन पुलावर अस्वच्छतेचे साम्राज्य
नीरा नदीवर १९२५ मध्ये बांधलेला ब्रिटीशकालीन पूल आणि २००५ मध्ये बीओटी तत्वावर बांधलेला नविन पूल असे दोन पूल आहेत. जुन्या पुलावरून पालखीतील पादुका नेल्या जातात, तर नविन पुलावरून हजारो वारकरी चालत जातात. पण सध्या नविन पुलावरील साईडपट्ट्यांमध्ये झाडंझुडपं, चिखल व कचरा साचलेला असून स्वच्छतेकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.
स्थानिकांची मागणी – तत्काळ कारवाई करा!
निरा व पाडेगाव येथील नागरिक, वाहनचालक आणि वारकरी भक्तांनी NHAI ने तत्काळ हस्तक्षेप करून पुलावरील साईडपट्ट्यांची स्वच्छता, रंगरंगोटी आणि जॉइंटमध्ये नवे रबर बसवण्याची मागणी केली आहे.
“पायी वारी करणाऱ्या हजारो भाविकांचा हा मार्ग आहे. अशा अवस्थेत वारकऱ्यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने उपाययोजना कराव्यात,” असे आवाहन स्थानिकांकडून होत आहे.

0 Comments